छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : हद्दपार गुन्हेगाराने चौकशी करणार्या पोलिसावरच चाकूने हल्ला करून हाताला चावा घेतला. पोलिसांची वाहने अडवल्याच्या प्रकरणात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भावसिंगपुरा परिसरात बुधवारी (दि.२५) घडलेल्या या प्रकारातील कुख्यात ईश्वर राजू चव्हाण (रा. आमेन चौक, भीमनगर, भावसिंगपुरा) याची छावणी पोलिसांनी त्याच परिसरात शुक्रवारी (दि. २७) रात्री धिंड काढली.
छावणी पोलिस ठाण्याचे हवालदार महाशंख नामदेवराव दांडगे (वय ४०) यांनी तक्रार दिली. त्यानुसार ठाण्याच्या हद्दीत हद्दपार आरोपी ईश्वर चव्हाण भावसिंगपुरा येथील आमेन चौकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
हाताला चावा, चाकूने वार
पोलिसांनी त्याची विचारपूस करताच त्याने वाद घालत, पोलिस हवालदार अफरोज खान यांना मारहाण केली. पोलिस अंमलदार नंदू सूर्यवंशी यांच्या हाताला चावा घेत पोलिस हवालदार दांडगे यांच्यावर चाकूने वार केला. याबाबत ईश्वरसह सचिन त्रिभुवन, विकास भालेराव, शंकुतला चव्हाण, अंजली चव्हाण, शीला त्रिभुवन, पायल त्रिभुवन यांच्यावर छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. यानंतर पोलिसांनी आमेन चौकातच ईश्वरची धिंड काढून मस्ती जिरवली. यावेळी त्या दिवशी धिंगाणा घालणारा ईश्वर खाली मान घालून निमूटपणे चालत होता.













